पंडित विश्वनाथव्यास बाळापूरकर विरचीत ज्ञानप्रबोध ओवी क्र २९ ते ४८

               
                       ।।श्री परेशाय नमः।।


                                          दिनांक:२८:०३:२०२०
                                                      शनिवार


   पंडित विश्वनाथव्यास बाळापूरकर विरचीत                         ज्ञानप्रबोध


तिएचा महिमा बोलतां : सकळ शास्त्रांं अपुर्णता
ते मज मतिहीना प्राकृता : वर्णवे केवि।।२९।।

अर्थ: कृपेचा महिमा बोलतानां सर्वशास्त्रांना अपूर्णता येते. मग मला मतिहीन खेडमटाला कृपेचा महिमा कसा वर्णन करता येईल ?।।२९।।


सकळ सीधांता अगोचर : परवस्तु निराकार
जेथचे कृपा-गहंवर : कवणा कळे ।।३०।।

अर्थ: सर्व सिध्दातांना निराकार ईश्वरवस्तु दिसत नाही. मग निराकार ईश्वराच्या ठिकाणी असलेली गहन कृपा कोणाला कळणार ? ॥३०॥


जया रुपाचा प्रकासु : पाहतां आगमा नाहीं सौरसु
दर्शनाचा विकासु : आखुडे जेथ ।।३१।।

अर्थ: ज्या ईश्वरस्वरुपाचा प्रकाश पाहतानां त्या प्रकाशाचा आगमाला सहवास नाही
व ईश्वरस्वरुपाच्या प्रकाशाच्या ठिकाणी सहा शास्त्राचा विकास लहान होतो.।।३१।।


पुराणे बूधी साबडीं : बोलतां वळे बोबडी
तेथ काव्ये बापुडी : कोठे लागती ।।३२।।

॥३२॥
अर्थ: पुराणाची बुध्दी तर धोष्टर आहे म्हणून ईश्वराचे वर्णन बोलतानां पुराणाची बोबडी वळते. मग काव्ये-बिचारे ईश्वराचे वर्णन कोठून करणार? ॥३२॥

योगशास्त्राचिया मती : तर्कशास्त्राचिया युक्ती
जे निर्वचितां भ्रांती : माजि पडिलीया ।।३३॥

अर्थ: योगशास्त्राच्या बुध्द्या आणि तर्कशास्त्राच्या युक्तया,ईश्वराच्या निर्वच करताना
भ्रांतीमध्ये पडल्या.॥३३॥


असो हे उन्मेखाचेनि तवकें : स्वयंबोधाचेनि तर्के
वेद पढों न सके : नेति म्हणे ।।३४।।

अर्थ: डोळ्याच्या पापण्या उघडण्याच्या आवेशाने व स्वत:च्या ज्ञानाच्या तर्कांने,त्रिगुण
वेद ईश्वराची महिमा बोलू शकत नाही. मग त्रिगुण वेद,ईश्वर असा ही नाही आणि असा ही
नाही एवढेच बोलतो.॥३४॥


भणौनि स्वरूप तवं गुह्यतर : मग तेथचे गुणसागर
जाणे ऐसे प्रचुर : ज्ञान कैंचें ॥३५।।

म्हणून ईश्वरस्वरुप अतिगहन आहे. मग ईश्वरस्वरूपातील कृपादी गुणाच्या सागराला जाणणारे  कोणते ज्ञान असणार आहे बर ?।।३५।।


तें न पविजे अन्य साधनें : नेणिजे इतर ज्ञानें
जे चिद्ब्रम्हामुक्ष मनेंं : रुप कल्पवे ना।।३६।।

ते ईश्वर प्राप्ती इतर साधनाने मिळत नाही. ते ईश्वरस्वरुप इतर ज्ञानाने कळतही नाही. ज्या ईश्वरस्वरुपाची कल्पनाही  मुख्यमायेला मनाने करता येत नाही. ।।३६।।



                       परावाचा महत्व


तरी परवाक्-सारदा : जया होये वरद
तया पर-जाणिव विसुद : हृदयासि ये॥३७॥

अर्थ: परावाचारूपी सरस्वती ज्याला वर देते.त्याच्या हृदयांत ईश्वरस्वरुपाची जाणीव विशुद्ध पणे होते.।।३७।।


ते मेघगंभीर वाचा : करी वरिसावो ज्ञानाचा
तै माहापुर ये जाणिवेचा : उन्मेख-गंगे॥३८॥

अर्थ: परावाचारूपी मेघाची गंभीर वाचा ज्ञानाचा वर्षाव करते. त्यावेळी स्फूर्तीरुपी गंगेला ज्ञानाचा महापूर येतो.।।३८॥


जैसे सोमकांत चंद्रकरी : जवं भेदिति ना अंतरी
तवं द्रवोनि श्रवती बाहीरी : जीवनाते॥३९॥

अर्थ: जसे चंद्राचे किरण सोमकांत पाषाणाला भेदत नाही. तोच सोमकांत पाषाण पाझरुन पाण्याला बाहेर सोडतो.।।३९।।


ना तरि मूढ नेणते : प्राज्ञ होति सारस्वतें
मग तेचि शब्दश्रुष्टीतें : चाळिते होती॥४०॥

नाही तरी मुर्ख अज्ञानी जेव्हां बुध्दीने हुशार होतात. तेव्हां तेच या शब्दश्रुष्टीला चालविणारे होतात.॥४०॥


तैसे परवाक्-परिसे : जयं बुधी-धातु न स्पर्शे
तवचि जीवीं असे : अज्ञानत्व॥४१॥

तसे मागील दोन उदाहरणा प्रमाणे परावाणीरूपी परीस बुध्दीरूपी धातुला जोपर्यंत स्पर्श करीत नाही, तोपर्यंत जीवाच्या ठिकाणी अज्ञानत्व असते.।।४१॥


मग पालटौनि अज्ञु : तोचि होये विचारज्ञु
की जीवाते सर्वज्ञु : परा वाचा।।૪૨।।

अर्थ: परावाणीरूपी परीस बुध्दी रुपी धातुला स्पर्श झाल्यावर. मग अज्ञान जन विचारवंत होतात. अशाप्रकारे परावाचा जीवाला ज्ञानी करते।।४२॥



भणौनि ते प्रबोधाचे जिव्हार : विवेकाचे भांडार
हों कोज तत्वसार : सकळ विद्यांचे

अर्थ: म्हणून परावाचा ज्ञानाचे जिव्हार आहे. परावाचा नित्यानित्यवस्तु विचाराचे भांडार आहे.परावाचा ही सर्व विद्येच्या तत्वांंचे सार आहे.।।४३।।


ते परशास्त्रीचे बीज : सकळ सिधांतांचे गुज
आत्मविद्या नीज : प्रकासक ।।४४।।

अर्थ: परावाचा ब्रह्मविद्याशास्त्राचे बीज आहे. परावाचा सर्वशास्त्राच्या सिष्टांना गुह्य आहे. परावाचा स्वतः ईश्वराला प्रकाशित करते.।।४४।।


तें सारासार विचारी : परवस्तु निर्धारी
जिया परब्रह्माक्षेरी : रिगावा होये।।४५।।

अर्थ: सारासारवस्तुचा विचार करणारी परावाचा ईश्वरवस्तुचा पक्का निर्धार करते. परावाचेमुळे जीवाचा ब्रह्मविद्येच्या अक्षरांत प्रवेश होतो.॥४५॥


ते अध्यात्मकुळदीपका : प्रसन्न होये आइका
तरी प्रमये स्फुर्ति तर्का : उजियेडु करी ।।४६।।


अर्थ: परावाचा अध्यात्माची कुळदीपिका आहे. ती प्रसन्न झाली तर काय होते ? परावाचा प्रसन्न झाली तर परावाचा ब्रह्मविद्येच्या अर्थाच्या स्फुर्तिचा व ब्रह्मविद्येच्या अर्थाच्या तर्काचा उजेड करते.।।४६।।


तिये वाचेवीण देखा : सहस्त्रवदना न ये लेखा
तो अनंतु मज मूर्खा : केवि लक्षा ये ॥४७॥

अर्थ: परावाचे वीना हजार तोंडाच्या शेषाला ईश्वराचे वर्णन करता येत नाही. मग तो अनंत असा ईश्वर मला मूर्खाला कसा वर्णन करता येईल? ॥४७॥


                           कथामहत्व


परी तो भक्ताचा कुवांसा : भावग्राहीकु या आसा
बांधतु असे धिवंसा : स्तुतीलागि ।।४८॥

 अर्थ:ईश्वर भक्ताचा वाईट प्रसंगात साथ देणारा साथीदार आहे व ईश्वराला भक्ताची श्रध्दा घ्यावी अशी इच्छा आहे. म्हणून विश्वनाथव्यासांना ईश्वर स्तुती करावयाची हाव आहे ।।४८॥


                                        प्रतीति पंथ ...🖋


Comments

Popular posts from this blog

विश्वनाथव्यास बाळापुरकर विरचीत ज्ञानप्रबोध ओवी क्रमांक १ ते १० अर्था सह।

पंडित विश्वनाथव्यास बाळापूरकर विरचीत ज्ञानप्रबोध ओवी क्र ४९ ते ६७