पंडित विश्वनाथव्यास बाळापूरकर विरचीत ज्ञानप्रबोध ओवी क्र ४९ ते ६७



              दिनांक:२९:०३:२०२०              
                         रवीवार       

                           
    पंडित विश्वनाथव्यास बाळापूरकर विरचीत                            ज्ञानप्रबोध                                           

जैसें धर्मश्रवणेंवीण : नव्हे दोषनिरसन
ना तरि न फिटे मूर्खपण : शास्त्रहीनाचें॥४९।।

 जसे धर्म ऐकल्याशिवाय दोषाच निरसन होत नाही.
नाही तरी धर्मऐकल्याशिवाय ब्रह्मविद्याशास्त्र हीनाचा मूर्खपणा जात नाही. ॥४९।।


तैसें न करितां गुणकथन : वाचेसि नाहीं पवित्रपण
न स्मरतां श्रीचरण : जीउ सुध नव्हे॥५०॥

तसे ईश्वराचे गुण सांगितले नाही तर वाचेला पवित्रपणा येत नाही व श्रीचरणाचे
स्मरण केले नाही तर जीव शुध्द होत नाही.।।५०॥


भणौनि भलतया परी : मूढी अथवा ज्ञातारी
स्तवावा श्रीमुरारी : गुणनिधान||५१||

म्हणून कोण्याहीप्रकारे मुर्खाने अथवा सज्ञानाने गुणाचा ठेवा श्रीमुरारीच वर्णन करावा.॥५१॥


परी कोरडीया जाणिवा : चाड नाहीं देवदेवा
तो आभारिजे सेवा : भक्तिभावें॥५२॥

परंतु देवाच्या देवाला कोरड्या ज्ञानाची चाड नाही. म्हणून देवाचा देव भक्ती
भावाने व सेवेकरुन प्रसन्न करावा. .॥५२।।


यालागि ग्रंथ सुर्वणाचां ताटी : भक्तिरसाची बोणेवाटी
प्रेमपूर्वक देईन गोमटी : देवा आरोगण॥५३॥

देवाचा देव भक्ती भावाने व सेवेकरुन प्रसन्न करावा. म्हणून (कवी) ग्रंथरुपी
सोन्याच्या ताटांत,भक्तीरसरुपी उपहाराची वाटी ठेवून,प्रेमपूर्वक व चांगल्याप्रकारचे
भोजन देवाला देईन.॥५३॥


सीधांत-कपुरवासें : घोळुनि साहीत्य-रसें
भाव-विडा प्रबंधमिसें : स्वामी देइन॥५४॥

(भोजनानंतर भक्तीने) भावरुपी विडा सिध्दांतरुपी कापुराच्यावासात व साहि
त्यरुपी रसात घोळन ज्ञानप्रबोध कथेच्या निमित्याने स्वामीना देईन.वाशा


तरी पोखलेनि प्रेमभावें : महंती आदरें आइकावें
हे न लगे प्रार्थावें : आर्त म्हणौनी॥५५॥

तरी पोसलेल्या प्रेमभावाने व आदराने महंतांंनी ज्ञानप्रबोध कथा ऐकावी. ज्ञानप्रबोध कथा आदराने ऐकावी अशी प्रार्थना करावी लागत नाही. कारण ते आर्तवंत आहेत.।।५५।।

लटिके वाग्जाळ : न बोलें पाल्हाळ
बोल भावगर्भ रसाळ : तैसें बोलैन॥५६॥

शब्दांचे जाळे खोटे असते म्हणून ज्ञानप्रबोध कथेमध्ये शब्दांचा विस्तार बोलत नाही. तर ज्ञानप्रबोध कथेच्या शब्दांत जो भाव आहे व त्या भावांत जो रसाळ गर्भीत अर्थ आहे म्हणजे ब्रह्मविद्येचा सिध्दांत आहे तसा बोलेन.
।।५६।।


तरी ते सुवर्म श्रोते : निर्मछर जाणते
ते परिसौनि ये कथे : थोर संतोखती॥५७।।

तरी जे कथे चे वर्म जाणणारे मत्सररहीत श्रोते आहेत. ते ज्ञानप्रबोध कथा ऐकून अधिक संतुष्ट होतील.||५७||


जेवि लेंकुरुवाचे बोलणे : बोबडेंचि कवतीकवाणे
ते संन्मुख होउनि सिहाणे : आइकों ठाकती।।५८।।

ज्या प्रमाणे लहान मुलाचे बोलणे बोबडे परंतु कौतुकवाणे असते. ते मुलाचे
बोलणे शहाणे लोक मुलाच्या समोर येऊन ऐकतात.।।५८।।।


परिसौनि तया शब्दांतें : मायेबापा ये स्नेहाचे भरितें
तेवि माझिये बाळमतीतें : संत मानवती॥५९॥
 मुलाचे बोबडे शब्द ऐकून मातापिताच्या स्नेहाला समुद्रासारखी भरती येते. तसे माझ्या बालबुध्दीला
संत मान देतील.।।५९।।


असो हे सांचे कथारंभु : जेणे परितोखौनि प्रभु
पसाया दे परम लाभु : म्हणे विस्वनाथु॥६०॥

ज्ञानप्रबोध कथेचे आरंभ असु द्या. आतां ज्ञानप्रबोध कथेला सुरुवात करतो.
ज्यामुळे ईश्वर संतुष्ट होऊन प्रसन्नतेने श्रेष्ठ लाभ देतो. असे विस्वनाथव्यास म्हणतात.॥६०॥


मोक्षकारण : ज्ञानत्रय : बाह्यत्याग

तरी चांग देउनि अवधान : आइकत संतजन
मोक्षमूळ कृपाजीवन : जेणें सीधे।।६१।।

मग ज्ञानप्रबोध कथा चांंगली लक्ष देऊन संतजनांनी ऐकावी. ज्या ज्ञानप्रबोध कथेने मोक्षाचे मूळ व कृपाजीवन प्राप्त होते.।।६१।।

जें इष्टानिष्टप्रकाशक : ज्ञान होये निःकळंक
पुनरावृत्तीसंसारमोचक : दैवंवसें ॥६२।।
इष्ट व अनिष्ट प्रकाशक ज्ञान आहे. ते कलंकरहीत आहे व जीवाला जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून देवाच्या कडाने मुक्त करणारे आहे. ।।६२।।


तयाचेनि विचार-उजाळे : आचारवृत्तीचेनि पाखोळे
कर्माअकर्मापासौनि चोखाळे : जीवात्मा हा ।।६३॥

ज्ञानाने विचार उजळतो व ज्ञानयुक्त आचाराने विचार शुध्द होतो. त्यामुळे हा जीवात्मा कर्म-अकर्मापासून शुध्द होतो.||६३।।


तया ज्ञानाची ऐसी वोळखी : जें बाणलें होय पुरुखी
ते तेथ चिन्हाचा विसेखीं : उमटों लागे ॥६४।।

त्या ज्ञानाची ओळखी अशी आहे. जे ज्ञान पुरुषाला झाले असता,त्यापुरुषाकडे त्याचवेळी ज्ञान,भक्ती,वैराग्य हे गुण विशेषप्रकाराने येऊ लागतात. ॥६४।।


तरी ज्ञान ये दोनिचि अक्षरें : विस्तारितां शब्दब्रह्म अपुरें
भणौनि मुद्रीत सारोधार : सांगैन आइका ॥६५॥


ज्ञान शब्द तर दोन अक्षराचा आहे. परंतु ज्ञान या दोन अक्षराचा जर विस्तार केला. तर ज्ञान या दोन अक्षरापुढे शब्दब्रह्म अपुरे आहे. म्हणून ज्ञानाचा सार थोडक्यात सांगतो तो ऐका ! ॥६५॥


प्रथम ज्ञान होतक्षेवीं : ईश्वर मायेबाप गोसावीं
उमटतुक्षेवो जीवीं : संवेंचि निगे॥६६॥

प्रथम ज्ञान होताच क्षणी ईश्वर माता,पीता व मालक आहे. असे अंतःकरणात येताच क्षणी जीव लागलीच घरा बाहेर निघतो.॥६६॥


ना तेथ राहिला सांतां : जेवि वस्तुकारु वाटे जातां
तेवि घरी असे उखिता : उदासपणे॥ ६७॥


जसा वस्तीकार वाटेने जात असताना वाटेवर उदास असतो. तसा ज्ञान असलेला बोधवंत घरी असून घरावर उदास असतो.।।६७।।



                                  प्रतीति पंंथ...🖋







Comments

Popular posts from this blog

विश्वनाथव्यास बाळापुरकर विरचीत ज्ञानप्रबोध ओवी क्रमांक १ ते १० अर्था सह।

पंडित विश्वनाथव्यास बाळापूरकर विरचीत ज्ञानप्रबोध ओवी क्र २९ ते ४८