विश्वनाथव्यास बाळापुरकर विरचीत ज्ञानप्रबोध ओवी क्रमांक १ ते १० अर्था सह।

                                         
                                        दिनांक: २६:०३:२०२०
                                                   गुरुवार

पंडीत विश्वनाथव्यास बाळापूरकर महानुभाव विरचीत ।
ज्ञानप्रबोध।



  श्री परेशाय नमः

  ईश्वराची स्तुती

जो वाचात्रया अतीतु : षडु प्रमाणा अव्यक्तु
तो वंदं सर्वात्मा उपकारभूतु : जीवोधरणु

।।१।।
जो पश्यंती,मध्यमा,वैखरी या तीन वाचेच्या वेगळा आहे. जो सहा शास्त्र किंवा अनुमान,उपमान
शाब्द,प्रत्यक्ष,अर्थापत्ती,अनुपलब्धी या सहा प्रमाणांना दिसत नाही. तो सर्वांचा आ
त्मा,उपकारभूत जीवाचा उध्दार करणारा,त्याला नमस्कार करूं. ॥१॥

तो जन्मादिबीजभूतां : इस्वरु निज पिता
भवमोचकु कैवल्यदाता : जैंं कृपा करी
॥२॥
तो जीव पदार्थांना बीजाप्रमाणे जन्म देणारा जीवाचा पिता ईश्वर,संसारातून
मुक्त करणारा,कैवल्याचा दानी,ज्यावेळी कृपा करेल.

।।२।।
तै आब्रह्मा पैलीकडे : ज्ञानसुर्ये उजीयेडे
सुधवेधातव जोडे : कैवल्यनिधी
॥३॥
तेंव्हा मायेच्या पलीकडे असलेला ज्ञानरुपी सूर्याचा उजेड पडेल
व त्याच्या शुद्ध वेधाने किंवा केवळ वेधाने तो कैवल्याचा निधी असलेला परमेश्वर जोडल्या जाईल

।।३।।

कृपा वर्णन


त्या निर्गुणा साक्षिभुता : जे उपजवी प्रसन्नता
भणौनि तैसी स्नेहाळू माता : दुजी नाहीं

॥४॥
जी कृपा त्रिगुणातीत व साक्षीभूत असलेल्या ईश्वराला प्रसन्नता उत्पन्न करते. म्हणून
कृपेसारखी तशी दुसरी स्नेहाळू माता नाही.

||४||
जे परमानंद-परदायेनी : भवमृत्योपशम संजीवनी
तें नमस्करूं जीवजननी : कृपा इश्वरीची

॥५॥
जी परमेश्वराचा परम आनंद देणारी आहे. जे संसारात मेले त्यांना जिवंत करणारी संजिवनी आहे. ती जिवाची माता म्हणजे ईश्वराची कृपा तिला नमस्कार करूं.

||५||



नागांबिका वंदन

तिये माउलीयेचा पाखवा : प्रेमजीवाळा जीवां
ते लाधली जिया पुर्व कणवा : वंदुं नागांबिका ।।६।।

त्या कृपामाऊलीचे पंखे जीवांना प्रेमरुपी जीवनकळा देतात अशी कृपामाऊली
पूर्व कणवेस्तव जिला प्राप्त झाली. त्या नागांबिकेला नमस्कार करू. ।।६।।

ते प्रेमकुसुमकळिकाभ्रमरी : की आनंद आस्वादन चकोरी
ना ते मज पांतां मूर्तधारी : ब्रह्मविद्या  ।।७।।

नागांबिका प्रेमरुपी फुलाच्या कळीची भ्रमरी आहे अथवा नागांबिका
श्रीमूर्तरूपी चंद्राचा आनंद सेवन करणारी चकोरी आहे. हे पण नाही. मी पाहिले
असता,नागांबिका मूर्तधारी प्रेमशक्तीच आहे.।।७।।




नागदेवाचार्य नमन


जो देवो दुर्लभु ब्रह्मादिकां : तो पुर्वीलीए आर्जणुका
त्या लाधला नागांबिका : मुनि नागदेवें ।।८।।


जो देव ब्रह्मादीकांना दुर्लभ आहे. तो देव पूर्व अर्जकत्वाने नागांबिकेला व मुनी नागदेवाला मिळाला.
।।८।।

तो अधिकरणा सीरोमणी : अज्ञानतमा तरणी
जाला भवार्णवी डोणि : बुडतेयांसि ।।९।।

तो नागदेव सर्व अधिकरणाचा प्रमुख झाला. अज्ञानरूपी अंधकाराचा सूर्य
झाला. संसाररूपी समुद्रात बुडणाऱ्यांची होडी झाला.

॥९॥

तया नागार्जुनाचेनि प्रसादें : मोहावर्त तरली मुनिवृदें
जो साळांकृत आचार्यपदें : तया नमन माझें॥१०॥

त्या नागार्जुनाच्या प्रसन्नतेने,अज्ञानरुपी भोवर्यात पडलेली शेकडो मुनिवृंंदे तरली. जो नागदेव सुशोभित आचार्य पदावर बसला. त्यांंना नमस्कार करतो.

॥१०॥



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

पंडित विश्वनाथव्यास बाळापूरकर विरचीत ज्ञानप्रबोध ओवी क्र २९ ते ४८

पंडित विश्वनाथव्यास बाळापूरकर विरचीत ज्ञानप्रबोध ओवी क्र ४९ ते ६७